Type Here to Get Search Results !

आरओ'तील पाण्याचा गढूळ प्रवाह; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

आरओ'तील पाण्याचा गढूळ प्रवाह; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष...

पुणे : उन्हाची तीव्रता वाढल्याने धायरी, किरकटवाडी, नर्‍हेसह समाविष्ट गावांत पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. असे असताना या गावांत मशिनने (आरओ) विक्री होत असलेल्या शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट केली जात आहे.

सार्वजनिक नळाच्या पाण्यावर मशिन बसवून दूषित पाण्याची शुद्ध पाणी म्हणून विक्री करणार्‍या पाणीमाफियांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे.

धायरी येथील बेनकरमळा, रायकरमळा, किरकटवाडी, नर्‍हे आदी ठिकाणी किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स तसेच चौकाचौकांत पाण्याचे मशिन बसवून पाणीमाफियांनी पाणी विक्रीची दुकाने थाटली आहेत. या पाणीमाफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर आणि नागरिकांनी केली आहे.

पाणीटंचाईचा गैरफायदा घेत मोफत मिळणार्‍या पाण्याचा या भागात काळाबाजार सुरू आहे. पाणी विक्रेत्यांनी खासगी कंपन्यांच्या मशिन बसवून शुद्ध पाण्याच्या नावाखाली विक्रीची दुकाने थाटली आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून अशा मशिनच्या पाण्याचा परिसरात सुळसुळाट झाला आहे. एका मशिनची किंमत एक ते चार लाख रुपये आहे. पाणी विक्री करणार्‍या मशिनवर प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. पाण्याची विक्री करणार्‍या माफियांवर व्यावसायिक पाणी कर लावावा, बेकायदा पाणीपुरवठा बंद करावा, मशिन व पाण्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments