एकलव्य कॉलेज ते पुणे-बंगळुरू महामार्गापर्यंत रस्त्याचे काम होणार; २ किमीचा वळसा वाचणार...
पुणे : कोथरूड येथील एकलव्य कॉलेज ते पुणे -बंगळुरू महामार्गापर्यंतचा अर्धवट रस्ता मिसिंग लिंक अतंर्गत लवकरच सुरू होणार आहे. महापालिका विकास आराखड्यात असलेला हा १५ मीटर रूंदीचा रस्ता असून शेवटच्या टप्प्यात अवघा १०० मीटरचा रस्ता ताब्यात नाही.
त्यामुळे पौड रस्ता तसेच महात्मा सोसायटीला वळसा घालून जवळपास दोन किलोमीटर अंतर तसेच २५ ते ३० मिनिटे करावा लागणारा प्रवास आता अवघ्या पाच मिनिटांत होणार आहे.
पालिकेने लक्ष केंद्रित केलेल्या ३३ मिसिंग लिंक पैकी अजून एका मिसिंग लिंकचे काम चालू होऊन वाहन चालकांना एक महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली. कोथरूड तसेच कर्वे पुतळ्याकडून वारजे तसेच चांदणी चौकाकडे जाण्यासाठी वाहनांना महात्मा सोसायटी अथवा पौड रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यातच, महात्मा सोसायटीचा रस्ता लहान असल्याने तर पौड रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने महापालिकेकडून काही वर्षांपूर्वी आशीष गार्डनपासून पुढे एकलव्य महाविद्यापर्यंत डीपी रस्ता विकसित करण्यात आला होता. तर, एकलव्य महाविद्यालयासमोरून महामार्गाकडे जाण्यासाठी आणखी ४०० मीटरचा प्रस्तावित होता. त्यात महामार्गाकडून सुमारे ३०० मीटर रस्त्याचे काम झालेले आहे.
शेवटच्या टप्प्यातील १०० मीटरचा रस्ता जागा ताब्यात नसल्याने बंद होता. त्यामुळे महापालिकेकडून "मिसिंग लिंक' प्रकल्पाअंतर्गत हा रस्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जागामालकांकडून ताबा प्राप्त झाला असून सुमारे १०० मीटर लांबीचा व १५ मीटर रुंदीचा रस्ता विकसनाचे जे काम बंद पडले होते ते एक-दोन दिवसात सुरू होणार असून एकलव्य कॉलेज पासून थेट हायवे ला जाता येणे शक्य होणार आहे.
Post a Comment
0 Comments