Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

चाकण परिसरात बाल गुन्हेगारीचा सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून निर्घृण खून ; पुणे जिल्ह्यात दहशतीचा थरार.



चाकण परिसरात बाल गुन्हेगारीचा सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून निर्घृण खून; पुणे जिल्ह्यात दहशतीचा थरार...

पुणे : चाकण (ता. खेड) येथे मागील दोन दिवसांपूर्वी एका १७ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून दोघा अल्पवयीन तरुणांनी निर्घृणपणे खून केला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून दहशतीचा थरार निर्माण केला.

अशा घटनांचा मागोवा घेतला तर अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळू लागल्याने चाकण परिसरात बाल गुन्हेगारीचा चाकण पॅटर्न उदयाला येतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आजपर्यंत अल्पवयीन तरुणांकडून चाकण परिसरात किल्ल्यातील खून, मेदनकरवाडी बालाजीनगर येथील खून, पीडब्ल्यूडी मैदानातील खून, रोहकल फाटा येथील खून या सर्व गुन्ह्यांतील आरोपी हे अल्पवयीन तरुण आहेत. त्यामुळे चाकण पंचक्रोशीत अल्पवयीन तरुणांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. नव्याने उदयास येत असलेला बाल गुन्हेगारीचा चाकण पॅटर्न सामाजिक दृष्टीने धोकादायक ठरू शकतो.

सोशल मीडियावर दहशत

चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे इझी मनीला महत्त्व वाढले आहे. यामुळे कंपन्यांमध्ये विविध कामांचे ठेके घेण्यासाठी गुन्हेगारी वाढली आहे. परिसरात अल्पवयीन तरुणांचे अनेक ग्रुप आणि टोळ्या तयार झाल्या आहेत. भाऊ, भाई, दादा, भावा, महाराज आदी नावांनी ग्रुप, टोळ्या सोशल मीडियावर कार्यरत आहेत. वेगवेगळ्या ॲक्शनमधील फोटो फ्लेक्स, सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टोळ्यांना गॉडफादर -

अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांना आणि ग्रुपला गॉड फादर असून, तेच यांना रसद पुरवून त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया करून घेत आहेत. चाकण पंचक्रोशीतील युवक व अल्पवयीन तरुणांनी टोळ्या व ग्रुप करायचे व त्या माध्यामातून गुन्हेगारी करण्याचा नवा फंडा या परिसरात रुजू होत आहे. गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्याचे मोठे आव्हान पोलिस व समाजासमोर निर्माण झाले आहे.

बाल गुन्हेगारांची आर्थिक परिस्थिती बेताची -

चाकण परिसरातील बहुतांश बाल गुन्हेगारांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आई-वडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि घरच्यांचा नसलेला धाक यामुळे अशी मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून अशा मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत. पालकांनीही आपल्या पाल्यांकडे जागरूक राहून लक्ष देणे गरजेचे आहे.

- राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलिस आयुक्त

२) बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनी संस्कारक्षम वयातच मुलांना चांगल्या - वाईट गोष्टींचे परिणाम काय होतात याची माहिती देणे आवश्यक आहे. आपली मुले दिवसभर कुठे फिरतात? कोणाबरोबर असतात? ते नियमित अभ्यास करतात का? याकडे लक्ष द्यायला हवे.

- बाळासाहेब चौधरी, सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

0 Comments