पुण्यातील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य; वापर न केल्यास आयुक्त करणार कारवाई...
पुणे : पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विना हेल्मेट दुचाकी चालवताना आढळ्यास कारवाई करण्यात येईल अशीही ताकीद देण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वी ज्या-ज्या शहरांमध्ये काम केले आहे तेथे दुचाकीस्वाराला हेल्मेट सक्ती केली होती. यामुळे अमितेश कुमार यांना पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर हेल्मेट सक्ती बाबत विचारण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे हे कायद्याने अनिवार्य असल्याने स्वतःहून हेल्मेट परिधान केले पाहिजे असे सांगितले होते.
नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी जनजागृती करण्यात येईल. त्यानंतर संबंधित घटकाशी चर्चा करून कारवाईला प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले होते. यामुळे शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी (ता। १४) पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. त्याचवेळी कुठल्याही कामाची सुरुवात स्वतःपासुन करावी आणि लोकांसमोर उदाहरण ठेवावे असे सांगण्यात आले आहे.
तर दुसरीकडे शहरात हेल्मेट सक्ती नसल्याचे सांगण्यात येत असले तरीही वाहतूक शाखेकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरात पुणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सुमारे ४ लाखांहून अधिक वाहनचालकांवर विनाहेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३६ कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये पुणे आरटीओ ने खासगी कंपन्यांना नोटीस पाठवून कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या.
Post a Comment
0 Comments