Type Here to Get Search Results !

चकवा देत फरार झालेला कैदी कोण? येरवडा जेलमधून फिल्मी स्टाइल पलायन

चकवा देत फरार झालेला कैदी नक्की कोण? येरवडा जेलमधून फिल्मी स्टाइल पलायन...

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृह प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण कारागृह प्रशासनाच्या हातावर तुरी देत एक कैदी पसार झाल्याचं उघड झालं आहे. आशिष जाधव असं कारागृहातून पसार झालेल्या कैद्याचं नाव असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव या कैद्याचं कारागृहातील वर्तन पाहून त्याच्याकडे रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. मात्र काल दुपारच्या सुमारास कारागृह अधिकाऱ्यांकडून कैद्यांची मोजणी करण्यात येत असताना एक कैदी उपस्थित नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर आशिष जाधव हा हत्येच्या गुन्ह्यातील कैदी फरार झाल्याचं स्पष्ट झालं.

कोण आहे आशिष जाधव?

पुण्यातील वारजे माळवाडी येथे २००८ मध्ये एक हत्याकांड झालं होतं. या प्रकरणात पोलिसांनी आशिष जाधव याला अटक केली होती. हत्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. तेव्हापासून तो शिक्षा भोगत होता. जाधव याचे वर्तनही चांगले असल्याने त्याला रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. मात्र काल त्याने सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत कारागृहातून पोबारा केला.

खुनाच्या गुन्ह्यातील कैदी पळून गेल्याने कारागृह प्रशासनाची नाचक्की झाली असून पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने येरवडा कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे. यापूर्वी कारागृहातील काही कैद्यांकडे मोबाईल सापडले होते. त्यानंतर आता कैदी फरार झाल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments