त्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी वापर केला जाईल अन् नंतर सोडून देतील ; रोहित पवारांनी बंडखोरांवर साधला निशाणा...
पुणे :- सध्या राज्यात ट्रिपल इंजिनचे महायुतीचे सरकार आहे. सत्तेत सहभागी असलेल्या या पक्षांतील धूसफूस चव्हाट्यावर येत आहे. तसेच अनेक नेते, आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. राज्याच्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया देत बंडखोरांवर निशाणा साधला आहे.सत्तेत सहभागी झालेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार गटाला पुरेसा निधी मिळत नसल्याचा दावाही करण्यात येतोय. यावरून रोहित पवार यांनी या आमदारांवर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, शिंदे आणि अजित पवार गटातील लोकांना लोकसभेपुरतेच वापरले जाईल. त्यांचे महत्त्व कमी झाल्यावर त्यांना सोडून दिले जाईल, अशी परिस्थिती निर्माण होईल. सुरुवातीला नेत्यांना आणि सामान्य नागरिकांना आमिषे दाखवायची, परंतु जेव्हा प्रत्यक्षात आश्वासने पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा काही करायचे नाही, असे भाजपचे धोरण असल्याचे रोहित पवार म्हणाले.
अजित पवार आणि अमित शहा यांच्या दिल्ली भेटीबाबतही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दिल्लीतील भेट सदिच्छा भेट असावी किंवा ठरल्याप्रमाणे भाजप काम करत नाही, यासह अनेक विषय असावेत. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेल्या शिंदे आणि पवार गटात 100 टक्के नाराजी आहे. फक्त नेत्यांमध्येच नाराजी नाही तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. मला आणि लोकांना असे वाटते की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिंदे-पवार गटातील काही नेते थेट भाजपमध्ये जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, भाजप त्यांचा वापर लोकसभा निवडणुकीसाठी करेल आणि नंतर त्यांना सोडून दिले जाईल, असे चित्र दिसत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
Post a Comment
0 Comments