पुणे मेट्रोकडून १२ जागांवर सुरु होणार वाहनतळ ; मार्च मध्ये सुरू होणार स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्ग...
पुणे : महामेट्रोकडून शहरातील १२ जागांचा वाहनतळ म्हणून विकास करणार आहे. याशिवाय मेट्रोच्या प्रत्येक स्थानकाकडे येणे व तिथून जाणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी ई-रिक्षा, शेअर रिक्षांसारखे उपायही सुरू करण्यात येत असून, गर्दीच्या स्थानकांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली. वाहनतळाच्या जागांवर प्रवाशांना नेणाऱ्या आणणाऱ्या रिक्षांसाठीही जागा असेल. तसेच बससारखी मोठी वाहनेही तिथून प्रवाशांची ने-आण करतील, असे हर्डीकर यांनी सांगितले. या जागा लहान आहेत. या जागा लहान आहेत, त्यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांसाठी वाहनतळ सुरू करता येणे शक्य नाही. त्यामुळेच रिक्षा, बस आदी वाहनांसाठीचा हा तळ असेल, असे हर्डीकर यांनी सांगितले.
संचालक हेमंत सोनवणे, सनेर पाटील हेही यावेळी उपस्थित होते. हर्डीकर यांनी २८ जुलै २०२३ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकार परिषद घेत मेट्रोच्या कामांचा आढावा घेतला. मेट्रोशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलण्याचे ठरविल्यामुळे विलंब झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
मेट्रोची कोणाबरोबरही स्पर्धा नाही. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक सुलभ करणे, सुरक्षित करणे, किफायतशीर करणे हे मेट्रोचा खरा उद्देश आहे. पीएमएपीएल, रिक्षा अशा अन्य सार्वजनिक प्रवासी वाहतूकीच्या पर्यांयांबरोबर हातमिळवणी केली तरच हे शक्य आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर पीएमपीएलचे प्रवासी कमी झालेले नाहीत, तर वाढले आहेत, असा दावा हर्डीकर यांनी केला. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा मेट्रोचा मार्ग मार्च २०२४ मध्ये व सध्या रुबी हॉलपर्यंतच असलेली मेट्रो रामवाडीपर्यंत डिसेंबरमध्ये सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
स्वारगेट ते कात्रज हा भुयारी मार्ग आता केंद्रीय स्तरावर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, तो सध्या सुरू असलेल्या मार्गाचाच विस्तारित भाग समजण्यात आला आहे. रामवाडीपासून पुढे वाघोलीपर्यंत, पिंपरीपासून पुढे निगडीपर्यंत, वनाजपासून पुढे चांदणी चौकापर्यंत हे विस्तारित मार्गही मंजुरीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. त्याशिवाय स्वारगेट ते खडकवासला, नळस्टॉप ते माणिकबाग, हडपसर ते स्वारगेट अशा मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार होत आहे. मेट्रोचे जाळे वाढल्याशिवाय मेट्रोचा खरा उपयोग दिसणार नाही, असे हर्डीकर म्हणाले.
वाहनतळ म्हणून विकास होणाऱ्या जागा
पीसीएमसी
संत तुकारामनगर
फुगेवाडी
शिवाजीनगर
सिव्हिल कोर्ट
स्वारगेट
आयडियल कॉलनी
गरवारे महाविद्यालय
मंगळवार पेठ
वनाज डेपो
रेंजहिल कॉर्नर
नळस्टॉप
Post a Comment
0 Comments