Type Here to Get Search Results !

नाझरे धरणातील पाणीसाठा संपुष्टात ; जेजुरी शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर...


नाझरे धरणातील पाणीसाठा संपुष्टात ; जेजुरी शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर...

जेजुरी : नाझरे धरणातिील पाणीसाठा संपुष्टात आल्याने जेजुरी शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. जेजुरी नगरपालिकेत याबाबत बैठक पार पडली. त्यात आमदार संजय जगताप यांनी जेजुरी एमआयडीसी योजनेतून शहराला लवकरच पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

जेजुरी नगरपरिषद सभागृहात नागरी सुविधांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार जगताप, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, गणेश शिंदे, हेमंत सोनवणे, महेश दरेकर, अनिल वीरकर, ईश्वर दरेकर, जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, संतोष खोमणे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले आदी उपस्थित होते.

मल्हार नाट्यगृह, रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, वीजपुरवठा आदी कामांचा या वेळी आढावा घेण्यात आला. यंदा झालेल्या अपुर्‍या पावसामळे जेजुरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नाझरे धरणात अत्यल्प व गाळमिश्रित पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट शहरावर निर्माण निर्माण झाले आहे. सध्या शहराला चार दिवसांतून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबत आमदार जगताप म्हणाले, नाझरे धरणात 104 दशलक्ष घनफूट गाळमिश्रित पाणीसाठा उरला आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून औद्योगिक वसाहतीमधील योजनेतून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मांडकी डोहावरील नादुरुस्त योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या योजनेचे पाणीदेखील उपलब्ध होणार आहे. ऐतिहासिक होळकर व पेशवे तलावातील पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हे पाणी राखीव ठेवून टंचाईच्या काळात वापरले जाणार आहे.

जेजुरी आणि सासवड शहराचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 269 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडण्यात आला आहे. सदर योजना पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांना शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. मल्हार नाट्यगृहाचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल. भाजी मंडईचे काम पूर्ण होत आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा लवकरच घेण्यात येणार आहे. भाजी मंडईत जुगार तसेच इतर अवैध धंदे सुरू असून, ते बंद करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. पाणीटंचाईमुळे नागरिक पाणीसाठा करीत आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी पालिकेने धुरळणी, फवारणी तसेच स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केली.

Post a Comment

0 Comments