कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर 'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' पुरस्काराने सन्मानित...
पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने ' ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराने यामध्ये चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर,पत्रकार, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे 'पॅड मॅन' योगेश पवार,अलविरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,सुनील हिरुरकर,विजय दगडे,पिया कोसुंबकर, नंदलाल मोर्य,गणेश थोरात,ॲड विनोद जावळे आणि आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शो डायरेक्टर अभिनेत्री पुजा वाघ होत्या.'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, माधव अभ्यंकर, अभिजीत चव्हाण, किरण माने, युवा अभिनेता अमित भानुशाली,अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, सायली देवधर, सौरभ चौगुले, पत्रकारिता क्षेत्रातील अरुण म्हेत्रे ( विशेष वरिष्ठ प्रतिनिधी, झी 24 तास), अरुण सुर्वे (मुख्य उपसंपादक, सकाळ),विजय कुलकर्णी (उपसंपादक, राष्ट्रसंचार),आरजे निमी,आरजे सौरभ आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्या विषयी बोलताना कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार म्हणाले,आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबवित असतो. या शो मधून जमा होणारा निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. 'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' पुरस्काराच्या निमित्ताने जमा होणाऱ्या निधी मधून दुर्गम भागातील महिलांना सॅनेटरी नॅप्किन्स चे वाटप केले जाणार आहे.
दीपाली कांबळे म्हणाल्या, कशिश सोशल फाउंडेशन सातत्याने समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींना प्रोत्साहित करण्याचे काम या 'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' पुरस्काराच्या माध्यमातून करत आहे. 'महिला आरोग्य' या विषयांवरही योगेश पवार अत्यंत चांगले काम करत आहेत. आज या सोहळ्यात भारतीय लष्करातील शूरवीर जवान वाणी यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली ही आमच्यासाठी आनंदाची बाब होती, तो क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक होता, वाणी यांच्या कर्तुत्वाला सलाम करताना मला अश्रु अनावर झाले, कारण त्यांच्यावर आलेला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.
सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या लष्करी जवान राजाराम वाणी यांचा विशेष सन्मान...
पुण्यातील हडपसर येथील रहिवासी असलेले भारतीय लष्करातील जवान राजाराम वाणी यांना भारत - पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आले त्यांचा 'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' पुरस्कार सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व कलाकार आणि मान्यवरांनी एकत्र येऊन वाणी यांना सन्मानित केले, यावेळी हाती तिरंगा घेण्यात आला होता, हा ह्रदयास्पर्शी सोहळा अनुभवताना वाणी अतिशय भावुक झाले होते. राजाराम वाणी भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत होते, २०१२ साली पुंछ जिल्ह्यात मेंधर येथे कर्तव्य बजावत. देशाचे संरक्षण करत असताना १२ डिसेंबर २०१२ रोजी एका भुसुरुंगांच्या स्फोटात त्यांना आपला पाय गमवावा लागला. त्यानंतर त्यांनी २०१९ पर्यंत लष्करातच अन्य विभागात सेवा बजावली आहे. त्यांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी कशिश सोशल फाउंडेशनने त्यांचा विशेष सन्मान केला.
Post a Comment
0 Comments