याबाबत चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने पवार हे आणखी काही दिवस नागरिकांना भेटणार नाहीत. त्यामुळे यंदा दिवाळी पाडव्याला अजित पवार हे नागरिकांना भेटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवाळी पाडव्याला गोविंदबागेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबीय नागरिकांना भेटतात. करोनाची दोन वर्षे वगळता ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. गोविंदबागेत पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून नागरिक येत असतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलीच दिवाळी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने अजित पवार हे गोविंदबागेत येणार का, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे.आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळुहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी पवार यांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर राहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटतो. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही, अशा शब्दात पवार यांनी आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करून पवार यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments