महाजनांच्या बोलण्यानंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम ; सांगितली आंदोलनाची पुढचा पाऊल...
जालना, 25 ऑक्टोबर : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. आज ही मुदत संपली आहे. 22 ऑक्टोबरलाच जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
सरकारला दिलेली मुदत संपली, चाळीस दिवस उलटून गेले तरी मराठा आरक्षणाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आरक्षण मिळेल अशी काल संध्याकाळपर्यंत आशा होती. आजपासून पुन्हा उपोषण सुरू करतोय. हे उपोषण अत्यंत कडक असेल. अन्न, पाणी आणि वैद्यकीय उपचार घेणार नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ म्हणाले होते, मात्र चाळीस दिवस उलटले तरीही गुन्हे मागे घेतले नाहीत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना फोन करून त्यांचीशी संवाद साधला आहे.
काय म्हणाले महाजन?
गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला. थोड्या दिवस थांबा टिकणारं आरक्षण देऊ अशी विनंती महाजन यांनी जरांगे पाटलांना केली आहे. तुमचे तीन ते चार विषय आठवडाभरात मार्गी लावू असं आश्वासन देखील महाजन यांनी जरांगे पाटलांना दिलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोला आता थांबणार नाही. उपोषण सुरू झाल्यानंतर कोणत्या नेत्याशीही बोलणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Post a Comment
0 Comments