पुण्यातील मेट्रो स्थानकाच्या उभारणीत त्रुटी ; महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले कबूल...
पुणे:- मेट्रो स्थानकांच्या उभारणीतील त्रुटी काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून शुक्रवारी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी काही त्रुटी असल्याची कबुली देत दुरुस्ती सुरू असल्याचे सांगितले.
दानवे यांनी महामेट्रोच्या कार्यालयाला भेट देऊन मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. या वेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे उपस्थित होते. या शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह इतर नेतेही बैठकीला उपस्थित होते. या वेळी दानवे यांनी पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उल्लेख केला. मेट्रोची सुरक्षितता ही जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असून, त्यात त्रुटी आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावर महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी कामात काही त्रुटी असल्याची कबुली दिली. या त्रुटी सामान्य असून, त्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करणारे सर्व तज्ज्ञ व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर महामेट्रोने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली. तांत्रिक कारणामुळे मेट्रो बंद पडत असल्याचाही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. या घटना आठवड्यातून एखाद्या वेळी घडत असून, त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment
0 Comments