Type Here to Get Search Results !

दोन बांगलादेशी नागरिकांसह भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे बनवणारा नवी मुंबई पोलिसांनी केले जेरबंद...

दोन बांगलादेशी नागरिकांसह भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे बनवणारा नवी मुंबई पोलिसांनी केले जेरबंद...

नवी मुंबई : (संपादक मुज्जम्मील शेख) कोपरखैरणे भागात बेकायदा भारतात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघांना भारतीय असल्याचे दाखवणारी बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या एजंटलाही अटक करण्यात आली असून, अन्य एक आरोपी फरार आहे.

दुल्लू प्रधान व फिरदोस शिकदार, अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे बांगलादेशी नागरिक कोपरखैरणेत वास्तव्य करीत असल्याची माहिती अनौतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एक एप्रिलला दुपारी दोनच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर १, पार्वती प्रोव्हीजन जवळ सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा मागितल्यावर त्यांनी पॅन कार्ड व आधार कार्ड दाखवले. मात्र दोन्ही बनावट असल्याशी शंका आल्याने पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्यांनी सदर आधार कार्ड व पॅन कार्ड हे एजंट गंगाप्रसाद तिवारीकडून बनविले असल्याचे सांगितले. त्यावरून गंगाप्रसाद तिवारी यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे अधिकचे पॅन कार्ड व आधार कार्ड मिळून आले. तसेच नगरसेवक यांचा रबरी शिक्का व सदरचा शिक्का वापरलेली कागदपत्रे मिळून आलीत.

गंगाप्रसाद तिवारी याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नगरसेवक यांचा बनावट रबरी शिक्का वापरून त्या आधारे रहिवासी दाखले बनवून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमांना पॅन कार्ड व आधार कार्ड बनवून दिले असल्याबाबतची कबुली दिली. सदर तीनही व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १०९ बनावट पॅन कार्ड व ११ बनावट आधार कार्ड व नगरसेवक यांचा बनावट रबरी शिक्का जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींचा सहकारी फैयाज याचा शोध सुरू आहे. भारतीय पासपोर्ट अधिनियमसह विदेशी नागरिक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments