मुंबई:राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेला ठामपणे विरोध दर्शविणारे मनसेचे नेते वसंत मोरे यांना मोठा झटका लागला आहे. राज ठाकरे यांनी वसंत मोरे (Vasant More) यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे. आता त्यांच्याजागी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा होती. त्यामुळे राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. हा अंदाज अखेर खरा ठरला आहे.
वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर मनसेच्या गोटात वादळ निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना बोलावण्यात आले होते. तर वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. तेव्हाच वसंत मोरे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार, याची कुणकुण लागली होती.
या सगळ्या घटनाक्रमानंतर वसंत मोरे हे देखील मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुण्यातील उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुक आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटसअॅप ग्रुपमधून वसंत मोरे बाहेर पडल्याचे समजते. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाविरुद्ध भूमिका घेतल्यानंतर या व्हॉटसअॅप ग्रूपवर जाहीरपणे मतभेद सुरू झाले होते. त्यामुळे वाद टाळण्यासाठी वसंत मोरे स्वत:हून या ग्रुपमधून बाहेर पडल्याचे सांगितले जाते.
वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांना विरोध केला होता. मशिदीवरील हे भोंगे हटले नाहीत तर त्याच मशिदीसमोर लाऊडस्पीकर्स उभारून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला होता. मुंबई आणि नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली होती. मात्र, राज ठाकरे यांचे विशेष लक्ष असलेल्या पुण्यात वसंत मोरे यांनी सुरुवातीपासूनच या आदेशाला विरोध केला. वसंत मोरे यांनी मी माझ्या प्रभागातील मशिदींसमोर भोंगे लावणार नाही,अशी भूमिका घेतली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. सध्या रमजानचा महिना सुरु आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती.
Post a Comment
0 Comments