'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य नव्हे जगण्याचं तत्व...
महाराष्ट्र पोलिस दल २ जानेवारी १९६१ रोजी स्थापन झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन. तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून पाच वर्षांपासून हा 'स्थापना दिन' साजरा होतो असा इतिहास आहे. परंतु इतके वर्षे हा शोध लागण्यास लागले किंबहुना समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र व्यस्त असल्यामुळे आपल्याच दलाचा स्थापना दिवस त्यांना साजरा करता आला नाही किंवा ते विसरले असे म्हणता येईल.'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ज्यांच्यासाठी फक्त ब्रीदवाक्य नसून जगण्याचं तत्त्व झालं आहे. ज्यांच्यासाठी 'खाकी' ही फक्त वर्दी नसून कर्तव्य झालं आहे आणि जे आपल्यासाठी फक्त कायद्याचा भाग नसून, आपलं संरक्षण करणारे आपले पालक झाले आहेत. विविध समाजघटकांत घडणाऱ्या अनेक हालचालींची नोंद ठेऊन काही गुन्हे घडण्यापासून रोखणे, घडलेल्या गुन्ह्यांचा निःपक्षपाती शोध घेणे, समाजातील अपप्रवृत्तीना रोखणे अशी अनेक कामे पोलिसांना दैनंदिन करावी लागतात. ऊन, वारा, पाऊस अशा कुठल्याही गोष्टींचा विचार करणे जमत नाही. सगळे धोके अंगावर झेलून समाजातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून काम करणारी ही सर्वश्रेष्ठ यंत्रणा आहे. अतिशय खडतर परिस्थितीही त्यांना कधी रोखू शकलेली नाही. वर्षानुवर्षे पोलीस दलात अनेक सुधारणा होत आहेत. अनेक गुन्ह्यांच्या शोधासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने पोलिसांचे काम थोडे सुकर झाले आहे. असे असले तरी गुन्हेगार प्रवृत्ती वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाढतच असल्याने जबाबदाऱ्याही वाढतच आहेत.
राज्यावर आलेली अनेक संकटं महाराष्ट्र पोलीस दलातील शूरवीरांनी आपल्या छातीवर झेलली आहेत. हा महाराष्ट्र तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या असंख्य शूरवीरांचा नेहमीच ऋणी राहील. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे शहर देशातील एकमेव सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असे शहर आहे. देशाच नाक आहे, देशाचा आर्थिक कणा आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा यंत्रणा सांभाळणारे मुंबई पोलीस जगातील सर्वश्रेष्ठ पोलीस दलांपैकी एक आहे. सर्वश्रेष्ठतेच्या शिखरावर नेण्यासाठी अर्थातच या दलातील प्रत्येकाला जो घाम गाळावा लागला आहे, त्या घामाचा एक एक थेंब मोत्याच्या किमतीचा आहे. राज्यात १० पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० च्या आसपास आहे. तब्बल 12 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी एवढी संख्या पुरेशी नाही. महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. कुटुंबातील मंडळी घरी वाट पाहत बसलेले असतांना सण आणि उत्सव साजरा करता येत नाही. आपण सगळे आपल्याला वाट्टेल तेंव्हा जगण्याचा आनंद घेतो तसा आनंद क्वचितच या विभागातील कोणाला घेता येत असेल. अत्यंत त्यागाच्या भावनेने (Duty before self) पोलीस काम करतात. त्यापाठीमागे त्यांच्या कुटुंबाचाही तेवढाच त्याग असतो. आपला पती, आपला भाऊ, बहीण, मुलगा कर्तव्यासाठी जेंव्हा घराबाहेर पडतो तेंव्हापासून तो परत येईपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना काळजी लागलेली असते. आज महाराष्ट्र स्थापना दिवसाच्या निमित्ताने हा लिहिण्याचा अल्प प्रयत्न मी करतोय. महाराष्ट्र पोलीस दलाचा परिचय, त्यांचे पराक्रम, त्यांचा प्रत्येकाचा त्याग याविषयी लिहिण्याला शब्द कमीच पडतील. लिहावे तेवढे कमी आहे. आपली काळजी घेणाऱ्या वर्दीतील माणसाबद्दल प्रत्येकाच्या मनात ऋण परतफेडीची भावना असावी. त्यांच्यावर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण कसा कमी करता येईल याविषयी शासनाने विचार करावा, तो ताण पडूच नये यासाठी समाजाने सहकार्य करावे एवढीच अल्प अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. महाराष्ट्र पोलीस दलातील सच्या आणि प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ प्रत्येकाला त्रिवार वंदन, त्यांच्या कार्याला कोटी कोटी सलाम...!!!
Post a Comment
0 Comments