राजकारण हे सेकंदा सेकंदाला बदलत असते त्यामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारण हे येत्या काही महिन्यांमध्ये अधिक अटीतटीचे आणि रंगतदार वळणावर येऊन ठेपण्याची शक्यता अधिक आहे. शरद पवारांचा पॅटर्न संपला असे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मध्ये असे काही फासे पडले की राज्यात भाजपच्या सर्वाधिक १०५ जागा निवडून आल्यानंतरही शरद पवार यांनी त्यांचा हातखंडा असलेला पवार पॅटर्न महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या आक्रमक, हिंदुत्ववादी आणि एकेकाळी भूमिपुत्रांची चळवळ असलेल्या संघटनेला चक्क राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बरोबर घेतले आणि भाजपच्या हातात गेलेल्या सत्तेच्या दोर्या पवार पॅटर्नने उधळून लावल्या.
पवार पॅटर्न -
राजकारणातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यात या पवार पॅटर्नचा हुकमी बोलबाला आहे. देशातील आणि त्यानंतर राज्यातील बदलत्या राजकीय गरजा आणि जाणिवा ओळखण्याची जी क्षमता शरद पवार यांच्याकडे आहे ती वादातीत आहे. त्यामुळे राजकीय परिस्थिती बदलली की देशातील व राज्यातील समीकरणे कशी बदलायची याची पुरेपूर माहिती सद्य:स्थितीत शरद पवार यांच्याकडेच अधिक आहे हे त्यांच्या राजकीय विरोधकांनाही मान्य करावे लागते. त्यामुळे करोनाच्या बदललेल्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही परस्पर विरोधी विचारसरणीच्या महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार किती काळ सत्तेवर राहणार याचे उत्तर शरद पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पवार पॅटर्नमध्ये आहे.
सुपर मुख्यमंत्री व हुकुमी एक्का म्हणजे शरद पवार यांच्याकडेच दिल्लीतील नेते मंडळी पाहतात...
जोपर्यंत या पवार पॅटर्नची राज्याला आवश्यकता असेल तोपर्यंत तरी महाराष्ट्रात पवार पॅटर्न सुरू राहील. अर्थात, शरद पवारांसारख्या पन्नास वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारणाचा अनुभव गाठीशी असलेल्या नेत्यांचे राज्यापेक्षाही अधिक लक्ष दिल्लीदरबारी लागलेले असते. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर जर शरद पवार आणि राष्ट्रवादीला उज्ज्वल संधी चालून आली तर महाराष्ट्रातदेखील सद्य:स्थितीपेक्षा आणखीन वेगळा पवार पॅटर्न अस्तित्वात आल्यास कोणाला आश्चर्य वाटू नये, अशी सध्या राज्यातील राजकीय स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा हुकमी एक्का आणि सुपर मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांच्याकडेच दिल्लीतील राजकीय वर्तुळातून पाहिले जात आहे. महाराष्ट्रात भाजपला डावलून शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेस सोबत मोट बांधत महाविकास आघाडी सरकार का स्थापन केले.
यासाठी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीआधीच या राजकीय परिस्थितीकडे बारीक नजरेने पहावे लागेल.
महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेबरोबर दोन वेळा युती सरकारद्वारे सत्तेत आलेला आहे. यामध्ये 1995 शिवसेना-भाजप युतीने काँग्रेसचे व पर्यायाने त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांचे सरकार निवडणुकीद्वारे पाडून महाराष्ट्रात सत्ता काबीज केली होती. त्यावेळी देखील शिवसेनेपेक्षा भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांच्याविरोधात अक्षरश: रान उठवले होते. भ्रष्टाचाराचे तसेच गुन्हेगारी संबंधांचे बेफाम आरोप त्यावेळी मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात करून पवारांची प्रतिमा ही जनमानसात मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या या आक्रमक शरद पवार विरोधी प्रचारामुळेच त्यावेळी भाजप आणि शिवसेनेला राजकीय फायदा झाला. महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर 2014 सालच्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख नॅशनॅलिस्ट करप्ट पार्टी असा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी वारंवार केला होता, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप करून राष्ट्रवादीची प्रतिमा जनमानसात कमालीची डागाळण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळी महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना अथवा भाजप यांच्याकडून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीकरणाचे, गुन्हेगारांशी असलेल्या संबंधांचे अत्यंत टोकाचे आरोप झाले तेव्हा शरद पवार यांना या आरोपांची मोठी राजकीय किंमत मोजावी लागली असा राजकीय इतिहास आहे.
२०१९ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नामशेष कसा होईल याचाच विडा उचलला होता. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मोठी लाट तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोकाचा शरद पवार विरोध आणि त्यात भरीस भर म्हणून शरद पवार यांच्या हुकमी साथीदारांनी एक एक करत राष्ट्रवादीची सोडलेली साथ अशा तिहेरी कात्रीत शरद पवार पुरते अडकले होते. त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात गेली पन्नास वर्षे संसदीय कार्य क्षेत्र ढवळून काढणार्या शरद पवार यांच्यावरच जेव्हा ईडीच्या माध्यमातून हात घातला गेला तेव्हा मात्र आता माझी सटकली, असा पवित्रा घेऊन शरद पवार हे महाराष्ट्रातील भाजपच्या विरोधात आणि त्यातही विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले.
५० वर्षांपासून संसदीय राजकारणात मुरलेल्या आणि मातब्बर समजल्या जाणार्या शरद पवार यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील स्थिती अत्यंत विदारक होती. विजयसिंह मोहिते पाटील, गणेश नाईक, जयदत्त शिरसागर, राहुल नार्वेकर यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी भाजप व शिवसेनेची कास धरली होती. यामध्ये शरद पवार यांनी गेली १५ वर्षे ज्यांना सातत्याने मंत्रिपदे व लाल दिवा देत सत्तेच्या प्रमुखपदी बसवले होते अशा राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांचाही समावेश होता. त्यामुळेच ती वेळ शरद पवार यांना पुन्हा एकदा त्यांचे राजकीय अस्तित्व सिद्ध करून दाखवण्याची होती.
महाराष्ट्रात तसं बघायला गेल्यास शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अशा दोनच नेत्यांनी राज्य पादाक्रांत केले होते असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र, जरी बाळासाहेब आणि शरद पवार हे परस्परविरोधी राजकीय विचारसरणीचे असले तरी या दोघाही नेत्यांनी एकमेकांच्या सोयीचे राजकारण केले. बाळासाहेबांनीही कधी शरद पवार यांना पूर्णपणे शिंगावर घेत राजकीय विरोध केला नाही. त्यामुळे शरद पवार यांनीही शहरी भागात फोफावत असलेल्या शिवसेनेला आडकाठी कधी केली नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे राजकारण हे तसे परस्पर पोषक असे राहिले. मात्र, शतप्रतिशतचा नारा देणार्या भाजपने शरद पवार यांचा महाराष्ट्रात पाडाव केल्याखेरीज महाराष्ट्र भाजपला एक हाती कधीही जिंकता येणार नाही याची खात्री असल्याने त्या त्या वेळच्या भाजपा नेत्यांनी शरद पवार यांची राजकीय प्रतिमा डागाळून त्याचा लाभ भाजपासाठी करून घेतला. राजकारणात मुरलेल्या शरद पवार यांना भाजपचा हा धोका सर्वात आधी लक्षात आला.
त्यामुळेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी, जहालवादी आणि त्यातही तब्बल पंचवीस वर्षाहून अधिक काळ भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला बरोबर घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मोट बांधण्याचे अवघड काम शरद पवारांना सारख्या कसलेल्या नेत्याने केले. त्याला मूळ कारणीभूत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा कडवा पवारविरोध हेच आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून भाजपबरोबर अडून बसल्याचे उघड होताच शरद पवार यांनी त्यांचे नेहमीचे पवार पॅटर्नचे जाळे फेकले. या जाळ्यामध्ये भाजप तर पूर्ण गारद झालीच मात्र कट्टर हिंदुत्वासाठी ओळखली जाणारी शिवसेनेसारखी आक्रमक संघटनाही नकळत पवारांच्या जाळ्यात अडकली आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महत्वाकांक्षी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पवार पॅटर्न नीट कळावा आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला तब्बल 105 आमदार निवडून आल्यानंतरही शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री व सरकार बनवता आले नाही हे कायमस्वरूपी अधोरेखित व्हावे यासाठीच पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून स्वीकार केला. यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यापेक्षाही किंवा बाळासाहेब यांच्याशी असलेली कौटुंबिक आणि वैयक्तिक नाती जपण्याचे काम पवारांनी केले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तब्बल ११० आमदारांच्या पाठबळावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवणे ही त्यावेळच्या या राजकीय परिस्थितीची गरज होती. हे शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याने हेरले होते आणि या गरजेतूनच महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन परस्पर विरोधी विचारसरणीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले.
पंतप्रधानांनी सुद्धा मानले गुरुस्थान...
अर्थात, शरद पवार यांचे राजकारण हे जेवढ्या गतीने महाराष्ट्राभोवती फिरत असते त्याहीपेक्षा दुप्पट गतीने ते केंद्र सरकारभोवती फिरत असते. त्यामुळेच पवारांचा एक डोळा हा महाराष्ट्रावर असतो तर दुसरा डोळा हा दिल्लीतील राष्ट्रीय राजकारणाचा वेध घेत असतो. दिल्लीतील सत्ताधारी नेतृत्वाशी टोकाचा राजकीय संघर्ष न करता मिळतेजुळते घेतल्यास महाराष्ट्र हातात ठेवणे शक्य असते, ही शरद पवार यांच्या आजवरच्या राजकारणाची खासियत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेला पंतप्रधानानेही शरद पवार यांना जाहीरपणे गुरुस्थान बहाल केले.
त्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा कालावधी किती अथवा ठाकरे सरकार आणखी किती काळ सत्तेवर राहणार याचे नेमके आणि अचूक उत्तर आजमितीला शरद पवार यांच्याखेरीज अन्य दुसर्या कुठल्याही नेत्याकडे नाही. महाराष्ट्रात नामशेष होऊ लागलेल्या राष्ट्रवादीला शरद पवार यांनी सत्तेत मानाचे स्थान मिळवून दिले. येणार्या काळात राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांना संधी उपलब्ध झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने पवार त्याचा फायदा करून घेतील. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, त्याचबरोबर शिवसेनेसारखी आक्रमक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पाळेमुळे मजबूत रोवलेली संघटना शरद पवार यांच्या हाती आली आहे. पवार यांच्यासारखा राजकारण कोळून प्यायलेला नेता ही संधी दवडणार नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
Post a Comment
0 Comments