दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) – तालुक्यातील गिरीम येथे जमीन खरेदीच्या नावाखाली 3.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन एजंटांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. पार्वती विश्वनाथ गरूडे (वय 35, रा. शालीमार चौक, दौंड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पवन थोरात व त्यांचे चुलते गोरखनाथ तबाजी थोरात (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी बनावट व्यवहार करून त्यांची फसवणूक केली.
14 ऑक्टोबर 2021 रोजी वरील दोघांनी मिळून फिर्यादीकडून दिड गुंठा जमिनीच्या मोबदल्यात 3,50,000 रुपये रोख रक्कम घेतली होती. खरेदीखत क्रमांक 3174/2021 अन्वये सब-रजिस्ट्रार कार्यालय, दौंड येथे नोंदणीही झाली. मात्र, काही दिवसांनी जागेची पाहणी करताना ही जमीन गोविंद भोंगळे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. त्यांनी त्या जागेतील खांब काढून टाकल्याची कबुली दिली.
पुन: पुन्हा मागणी करूनही संबंधित एजंटांनी जागेचा ताबा दिला नाही तसेच घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर फिर्यादीने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पवन थोरात व गोरखनाथ थोरात यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 420 अन्वये गुन्हा नं. 323/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.
Post a Comment
0 Comments