पुणे : फेंगल चक्रीवादळामुळे राज्यासह देशातील वातावरण बदलाने राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
फेंगल चक्रीवादळ तामीळनाडू व पुद्दुचेरीच्या उत्तर किनारपट्टीवर स्थिर आहे. त्याची वाटचाल कमी वेगाने पश्चिमेकडे होत असून, पुढील काही तासात यया चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, त्याचा परिणाम कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील होईल. पुढील दोन दिवस राज्यातील हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल.
दि. २ ते ५ डिसेंबर दरम्यान, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यासह घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे ३० ते ४० ताशी वेगाने वाहतील. या परिणामाने धाराशिव, रायगड, सांगली, सोलापूर, पुणे, रायगड, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
थडीची लाट काहीशी ओसरली
हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे गेल्या २४ तासांत राज्यातील कमाल व किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काहीशी ओसरली असून, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Post a Comment
0 Comments