मुंबई :- महाराष्ट्रात आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
इतक्या मोठ्या सोहळ्यात राज्याचे ३ नेतेच शपथ घेणार असून अद्याप मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
याबाबत माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील म्हणाले की, आज तिघांचा शपथविधी होईल जे निश्चित झालं आहे. २ उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री हे शपथ घेतील. त्यानंतर पुढच्या २ दिवसांनी ७ आणि ८ डिसेंबरला विधानसभेत आमदारांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर अध्यक्षांची निवड होईल. अजितदादांनी आमदारांना सूचना दिल्यात २ दिवसात शपथविधी उरकायचा आहे. पंतप्रधान मोदींचं शेड्युल्ड, किती मंत्र्यांनी शपथ घ्यायची हे सर्व विचार करूनच निर्णय घेतला जाईल. आमदारांचा शपथविधीही महत्त्वाचा आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचा शपथविधी होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच कुठलेही आमदार नाराज नाही. मंत्रिमंडळात कुणाला मंत्रिपदाची शपथ मिळणार हेच माहिती नाही. त्यामुळे खातेवाटपाचा विषय लांबच राहिला. आज केवळ फक्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा कसा उत्तम पार पडेल यावर आमची चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांची सोय कशी असेल, आमदारांना पास मिळाले की नाही. पक्ष कार्यालयातून समन्वय सुरू आहे. व्हिव्हिआयपी आज मोठ्या प्रमाणात मुंबईत असणार आहेत. अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार १०० टक्के होणार आहे. एनडीएच्या घटक पक्षांशी चर्चा होऊनच निर्णय घेतला जाईल असं अनिल पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, प्रत्येकाला वाटतं आपली मंत्रिपदावर वर्णी लागली पाहिजे. मागे झालेले मंत्री असो किंवा नवे कुणी असो सगळ्यांना मंत्रिपद हवं असते. कुणाला किती खाते मिळणार हे वरिष्ठ ठरवतील अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली.
Post a Comment
0 Comments