दिल्ली : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून देशभरातील पायाभूत सुविधांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. यातच आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एक महत्वाची माहिती दिली.
लोकसभेत बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकार लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चात सातत्याने वाढ करत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 11.11 लाख कोटी रुपयांचे भांडवली खर्चाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.
पंकज चौधरी पुढे म्हणाले की, सरकारचा भांडवली खर्च 2021-22 मधील 5 लाख कोटी रुपयांवरून 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 11.11 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मोदी सरकारचे लक्ष चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आहे. गेल्या 10 वर्षांत देशातील रस्ते, विमानतळ आणि रेल्वे क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाली आहे. यामुळे लोकांचे जीवन अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढले
राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढले आहे. 2014 मध्ये 91,287 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते, जे नोव्हेंबर 2024 पर्यंत 1,46,195 किमी पर्यंत वाढले आहेत. भारतमाला प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात 34,800 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले जाणार आहेत. त्यापैकी 26,425 किलोमीटरचे काम देण्यात आले आहे, तर 18714 किमी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. देशातील कार्यरत विमानतळांची संख्या दुपटीने वाढली आहे. 2014 मध्ये 74 विमानतळांवरून उड्डाणे सुरू होती, तर 2024 मध्ये देशातील 158 विमानतळांवरून विमानसेवा सुरू होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण
रेल्वेबाबत पंकज चौधरी म्हणाले, 97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई नेटवर्कच्या बळकटीकरणामुळे देशातील आर्थिक विकासाचा वेग तर वाढला आहेच, पण स्थानिक पातळीवर मूलभूत सुविधांमध्येही सुधारणा झाली आहे आणि त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Post a Comment
0 Comments