Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

प्रचारात १० पेक्षा अधिक वाहने नको; आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून आचारसंहितेची अंमलबजावणी

 

पुणे : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ११ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. येथील निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शिरूर, पुरंदर, भोर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट आणि कसबा या ११ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तेथील निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शर्मा यांनी आदेश दिले आहेत. हे आदेश २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.


याची चाेख अंमलबजावणी करा

१) कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा/सभेचे ठिकाण व वेळ याबाबत संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
२) कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्याबाबत संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
३) ध्वनिक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत करू नये.
४) फिरत्या वाहनांवरून ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. ध्वनिक्षेपकाचा वापर वाहन थांबवूनच करावा.
५) ध्वनिक्षेपकाचा परवाना जवळ बाळगावा.
६) ध्वनिक्षेपकाच्या आवाज मर्यादेची काटेकोरपणे पालन करावे.
७) शाळा, कॉलेज, रुग्णालय या ठिकाणी थांबून ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.
८) निवडणुकीच्या कालावधीत प्रचाराच्या अनुषंगाने एका वेळी कोणत्याही परिस्थितीत १० पेक्षा अधिक वाहने एका ताफ्यात चालवू नयेत, तसेच दोन ताफ्यातील अंतर २०० मीटर/१५ मिनिटांचे असावे.
९) ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अथवा जाणार नाही, ती वेळ व मार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी निश्चित करावा.
१०) सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणूक कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता आणि निश्चित करून दिलेली वेळ यावर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण करावे.

Post a Comment

0 Comments