अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला डॅशिंग महिला पदाधिकारी करणार रामराम...
पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच पक्षांमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याने काही पदाधिकारी पक्षाला राम राम करण्याच्या तयारीत आहे.
यामध्ये एका महिला पदाधिकाऱ्याचा समावेश असून ही महिला पदाधिकारी एका दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली होती.
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या या महिलेने अजितदादा यांच्याबरोबर जाणे पसंत केले. ही महिला पदाधिकारी यापूर्वी मनसे मध्ये होती. तेथे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम केले असल्याची चर्चा आहे. त्या पक्षात आपल्या कामाची दखल घेतली जात नाही, असे म्हणत या माजी नगरसेवक असलेल्या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष यांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना हे देखील भाजप बरोबर महायुतीत सहभागी झालेले आहेत. त्यातच मनसेने देखील महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीत घेतला आहे. त्यामुळे मनसे मधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
Post a Comment
0 Comments