मित्र पक्षांच्या सक्रिय योगदानामुळे पुण्यातील काँग्रेसची दावेदारी अधिक मजबूत...
पुणे : रवींद्र धंगेकर - महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय आणि उत्तम योगदान दिल्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच अन्य संघटना व मित्रपक्षांनी पुण्यात झोकून देऊन काम केले आहे. केंद्रात सत्ता परिवर्तन करायचेच या संकल्पनेने या सर्वच पक्षाचे कार्यकर्ते झपाटलेले आहेत. पुण्यात कार्यरत असलेल्या कष्टकऱ्यांच्या संघटना, पर्यावरणवाद्यांच्या संघटना, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारांच्या संघटना, महिला संघटना, अनेक गणेश मंडळ कार्यकर्ते आदी सर्वच गटांनी काँग्रेसच्या प्रचारात मोठे योगदान देऊन पुण्यातील वातावरण बदलून टाकले आहे. त्यांच्या योगदानामुळे काँग्रेसची ही निवडणूक अत्यंत सोपी झाली आहे असेही धंगेकर यांनी म्हटले आहे.
निवडणूक मैदानात सक्रिय असलेल्या या सर्व मित्र पक्ष आणि गटांच्या कार्यकर्त्यांशी काँग्रेस पक्षातर्फेही चांगला समन्वय राखला जात आहे. पुण्यात समाजवादी विचारांचे तसेच कम्युनिस्ट विचारांचे अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा फोलपणा लक्षात आला आहे त्यामुळे हे कार्यकर्ते स्वतःहून परिवर्तनासाठी सगळ्याच भागात झटताना दिसतात. अनेक महिला संघटनाही या प्रचारात सक्रिय झालेल्या आहेत. काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेली वचने सर्वांच्याच पसंतीला उतरली असून त्यातील मुद्देही हे सगळे कार्यकर्ते लोकांपुढे प्रभावीपणे नेत आहेत, त्याचा अत्यंत अनुकूल परिणाम सगळीकडे दिसून येतो आहे. कार्यकर्ता जेव्हा स्वयंस्फूर्तीने कामाला लागतो तेव्हा तो इपसीत ध्येय गाठल्याशिवाय शांत राहत नाही याचाच अनुभव या निवडणुकीत निश्चितपणे येईल असा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
Post a Comment
0 Comments