मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया...
पुणे : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सोमवारी (दि.२९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती, मावळ, शिरूर, पुणे या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.
या सभेमध्ये मोदींनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. या टीकेवर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
महाराष्ट्र एका 'भटकत्या आत्म्या'चा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली होती. मोदी यांच्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मी पुढच्या सभेत भटकती आत्मा कोण हे मी मोदींना विचारेन असं अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कोणता उद्देश ठेवून ही टीका केली हे देखील मोदींना विचारेन असं अजित पवार म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
पंतप्रधान मोदींनी पुण्यातील भाषणामध्ये शरद पवारांवर निशाणा साधला. "महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे. ४५ वर्षांआधी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली," असं म्हणत मोदींनी थेट उल्लेख न करता शरद पवारांवर निशाणा साधला. "तेव्हापासून (मागील ४५ वर्षांपासून) महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु आहे. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. ही आत्मा काहीही करते. विरोधकांनाही तिने अस्थिर केलं आहे. ही आत्मा आपल्या पक्षाला आणि कुटुंबालाही अस्थिर केलं आहे. १९९५ महायुती सरकारवेळीही या आत्माने सरकारला अस्थिरत करण्याचा प्रयत्न केला," असंही मोदी म्हणाले.
Post a Comment
0 Comments