Type Here to Get Search Results !

लासुर्ण्यात ३१ लाखांचा गुटखा जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल...

लासुर्ण्यात ३१ लाखांचा गुटखा जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल...

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सराईत गुटखा माफिया प्रशांत गांधी याच्या फार्म हाऊसमधून सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांच्या नेतृत्वाखाली सुपे पोलिसांनी तब्बल ३० लाख ९८ हजार ८२० रुपयांचा सुगंधी पान मसाला, गुटखा व एक पिकअप वाहन जप्त केले.

परीविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशांत गांधी याच्या घरी अवैध बेकायदेशीर पान मसाला गुटखा विक्रीसाठी आणलेला आहे. ही खात्रीशीर माहिती मिळताच दर्शन दुग्गड यांनी सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बारामतीतील पेन्सिल चौकातील ऋषिकेश अपार्टमेंटमधील प्रशांत धनपाल गांधी याच्या घरी जाऊन चौकशी केली. दोन पंचांसमक्ष झडती घेतली, मात्र तिथे काहीच आढळून आले नाही. त्यानंतर दर्शन दुग्गड यांनी चौकशी केली असता, कर्नाटकमधून निसार नावाचा माणूस हा पान मसाला, गुटखा यवत (ता. दौंड) येथील राहुल मलबारी याला देण्यासाठी जात असताना गाडी नादुरुस्त झाली. त्यामुळे उंडवडी येथील विद्युत उपकेंद्राजवळील प्रशांत गांधी यांच्या मालकीच्या फार्म हाऊसमध्ये हा गुटखा ठेवल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, अधिकारी दुग्गड, सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी उंडवडी सुपे येथील प्रशांत गांधीच्या फार्महाउसवर जाऊन दोन पंचासमक्ष झडती घेतली. तेव्हा त्या फार्म हाऊसमध्ये तीन खोल्यांमध्ये ३० लाख ९८ हजार ८२० रुपयांचा गुटखा व एक पीकअप वाहन आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी प्रशांत धनपाल गांधी यांच्यासह निसार व यवत येथील राहुल मलबारी या तिघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

प्रशांत गांधी याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड, सुप्याचे सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील, फौजदार योगेश दोडके, लेंडवे, जिनेश कोळी, महिला फौजदार देशमुख, हवालदार काळे, इंगवले, तुषार डावरे, सुदर्शन डोळाळकर आदींनी केली.


Post a Comment

0 Comments