यवतमाळ : सोमवारी किन्ही येथे 'शासन आपल्या दारी'हा उपक्रम अतिशय थाटात पार पडला. सुमारे ५० हजारांवर लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून यशस्वीतेचा जणू प्रतिसाद दिला. मात्र, या कार्यक्रमासाठी जनतेच्याच खिशातील सुमारे ४ कोटी ४६ लाखांची रक्कम खर्ची करण्यात आली आहे.
नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत किन्ही येथे झालेला हा कार्यक्रम लाभार्थ्यांच्या गर्दीमुळे लक्षवेधी ठरला. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात कार्यक्रमाला झालेल्या गर्दीचे कौतुक केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात घोषणा केल्या. जिल्ह्यातील ७५ शाळा मॉडेल स्कूल करणे, रिक्त असलेली शिक्षकांची पदे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूप भरणे, १६ हजार झटका मशिनचे वाटप करणे तसेच सिंचन प्रकल्पासाठी ठोस निधी देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. याबरोबरच सुरळीत वीज पुरवठा तसेच आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिरसा मुंडा वास्तू संग्रहालयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगतानाच समृद्धी महामार्गाची यवतमाळला कनेक्टिव्हिटी देऊ, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली. खरे तर यातील अनेक विकासकामांच्या घोषणा पालकमंत्री संजय राठोड यांनी यापूर्वीच केल्या आहेत. व्हितारा व इतर कंपन्या पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनीही याची पुनश्च घोषणा केली. सरकारने शब्द दिलेली ही विकासकामे येणाऱ्या दिवसात तातडीने मार्गी लागण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर यवतमाळमध्ये येऊ घातलेल्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. या घोषणांची पूर्तता न झाल्यास मात्र साडेचार कोटी रुपये खर्चूनही यवतमाळकरांच्या ओंजळी रिकाम्याच राहतील.
जनतेच्या दारी येण्यासाठी असा केला खर्च
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत किन्ही येथे भव्य शामियाना उभारण्यात आला होता. या शामियान्यावर तब्बल २ कोटी १९ लाख रुपये खर्च झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी वापरण्यात आलेल्या विद्युत व्यवस्थेसाठी २२ लाखांचा खर्च झाला आहे. तर ज्या भोजन व्यवस्थेवरून कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला ते जेवणाचे पॅकेटस् सुमारे ४५ लाख रुपये किमतीचे होते. कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ५० हजारांवर लाभार्थी मोठ्या अपेक्षेने आले होते. या लाभार्थ्यांची ने-आण करण्यासाठी ५९९ एसटी बसेस बुक केल्या होत्या. या गाड्यांच्या किरायासाठी तब्बल १ कोटी ६० लाख रुपये खर्च आला आहे. शासन परित्रकानुसार जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) उपलब्ध असलेल्या एकूण निधीच्या कमाल १ टक्के निधी (३ कोटी रुपयाच्या मर्यादेत) खर्च करण्यास शासनाची मान्यता होती, तर उर्वरित निधी आमदार फंडातून वळविण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments