'चॅम्पियनशिप कॅट शो'चे 5 नोव्हेंबर रोजी आयोजन...
पुणे :- द फेलाईन क्लब ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने येत्या 5 नोव्हेंबर रोजी पुण्यात एका आगळ्या वेगळ्या 'चॅम्पियनशिप कॅट शो'चे आयोजन करण्यात आले आहे. या कॅट शो मध्ये पुणेकरांना विविध देशांतील प्रजातींच्या मांजरी बघायला मिळणार आहेत. तसेच मांजर प्रेमींसाठी विविध प्रकारची माहिती एका छताखाली मिळणार आहे, अशी माहिती द फेलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकीब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला बिकास मोहंती ( मार्केटिंग मॅनेजर, ऑरेंज पेट न्यूट्रीशीएन) , डॉ. सलोनी जोशी (मांजर तज्ञ, पॉसम व्हेट क्लिनिक) आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना साकीब पठाण म्हणाले, द फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने भारतात विविध शहरात 'चॅम्पियनशिप कॅट शो'चे आयोजन करण्यात येते. पुण्यातील शो रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी तुलसी व्हीला लोणकर आळी, मगरपट्टा, मुंढवा येथे सकाळी 10 वा. ते सायंकाळी 7 वा. या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 300 हून अधिक कॅट्स सहभागी होतील असा अंदाज आहे. या शो मध्ये दिवसभर विविध उपक्रम होणार आहेत. ग्रूमिंग, अडोपटेशन, रजिस्ट्रेशन या संबंधी माहिती दिली जाणार आहे, तसेच याठिकाणी कॅट फूड आणि अन्य साहित्याच्या स्टॉल्स देखील असणार आहेत.
या 'चॅम्पियनशिप कॅट शो' मध्ये विजेत्या कॅट ची निवड ही आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवण्यात आलेल्या निकषाप्रमाणे करण्यात येते, ज्यानुसार कॅट ज्या प्रजातीची आहे त्यानुसार तिचे योग्य वजन, वाढ, आरोग्य आहे किंवा नाही यावरून करण्यात येते. यामुळे तुमच्या मांजरीला काय येते? यापेक्षा तुम्ही तिची योग्य निगा राखताय की नाही ? हे पहाणे गरजेचे असणार आहे. या 'चॅम्पियनशिप कॅट शो'चे परीक्षण मायकेल वुड्स (ऑस्ट्रेलिया) फॅडली फौद (इंडोनेशिया) हे करणार आहेत, असेही पठाण यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments