Type Here to Get Search Results !

लोकांना हेल्मेट घालण्यासाठी जागृत करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी पर्यंत सायकल प्रवास

लोकांना हेल्मेट घालण्यासाठी जागृत करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी पर्यंत सायकल प्रवास...

पिंपरी : रस्ते अपघातामध्ये केवळ हेल्मेट घातले नाही म्हणून तरुणाला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर त्याच्या चुलतभावाने हेल्मेट वापरासाठी जनजागृतीचा निश्चय करत जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास सुरू केला.

हा तरुण नुकताच पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून प्रवास करून हिंजवडी येथे आला होता. देवेश अग्रवाल असे त्याचे नाव असून, ४ जुलैपासून त्याने जम्मूपासून सायकलवर प्रवास सुरू केला.

देवेश याने सांगितले की, तो व्यवसायाने वाहनचालक आहे. खासगी वाहन चालवून तो कुटुंबाचा सांभाळ करतो. मात्र, अपघातामध्ये त्याच्या चुलत भावाला जीव गमवावा लागला. दुचाकीवरून जाताना त्याने हेल्मेट घातले नव्हते. त्याने हेल्मेट घातले असते तर अपघातामध्ये जीव वाचला असता. भावासारखे कित्येक जण केवळ हेल्मेट घातले नाही म्हणून अपघातात मृत्युमुखी पडत असतील, या विचाराने देवेश अस्वस्थ झाला. त्याने हेल्मेट वापरण्याच्या जनजागृतीसाठी सायकलवरून जम्मू ते कन्याकुमारी प्रवास करण्याचा निश्चय केला.

व्हिडीओ पाहून मिळाली प्रेरणा

यू-ट्यूूबवर ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने जम्मू ते कन्याकुमारी सायकल प्रवास केल्याचा व्हिडीओ देवेशने पाहिला. तो पाहून सायकलयात्रा करण्याची प्रेरणा मिळाली. ज्येष्ठ नागरिक करू शकतो तर मीही करू शकतो, हे देवेशने आई-वडिलांना पटवून दिले आणि प्रवासाची तयारी सुरू केली.

प्रवासाच्या नियोजनापेक्षा जागृतीला महत्त्व

देवेशने ठरावीक दिवसांमध्येच कन्याकुमारी गाठायचे असे ध्येय ठेवलेले नाही. प्रवास करत असताना जनजागृती करण्यावर त्याचा भर आहे. त्यामुळे ४ जुलैला निघून नुकताच पुण्यात पोहोचला. आता सातारा-कोल्हापूर मार्गे पुढे जात आहे. देवेश म्हणतो की, महाराष्ट्रातील लोक प्रेमळ आहेत. प्रेमाने चौकशी करतात. मदतीचा हात पुढे करतात.

घरची परिस्थिती हलाखीची आहे. मात्र, प्रवासाला निघालो तर लोक नक्कीच मदत करतील. आपला हेतू चांगला आहे, याची खात्री होती. त्याचा प्रत्यय प्रवासामध्ये येतो आहे. अनेक ठिकाणी लोक थांबवून मदतीचा हात देतात. जेवणाचे निमंत्रण देतात. फार कमी वेळा मला खिशातील पैसे खर्च करावे लागले. - देवेश अग्रवाल

Post a Comment

0 Comments