पुणे: दौंड प्रतिनिधी -(संघराज गायकवाड मयुर साळवे)*– शहरातील प्रमुख रस्त्यांवर रायडर्स आणि बुलेट गाड्यांच्या वाढत्या वर्दळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या ‘सिलेंसर काढलेल्या’ बुलेट गाड्यांच्या आवाजामुळे झोपेचा खोळंबा होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दौंड शहरातील विविध भागांमध्ये काही तरुण रायडर्सनी बुलेट गाड्यांमध्ये बनावट किंवा सायलेंसरविरहित बदल करून त्यांचा वापर करणे सुरू केले आहे. या गाड्यांचा आवाज इतका कर्णकर्कश आहे की त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, तसेच रुग्ण प्रचंड त्रासले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, संध्याकाळच्या वेळी विशेषतः स्टेशन रोड, गांधी चौक, नगर रोड आणि गोपाळवाडी रोड परिसरात या गाड्यांचा ‘धमाका’ अधिक प्रमाणात जाणवतो. अनेकदा तरुण ‘स्टंट’ करताना दिसतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पोलिस प्रशासनाने यावर कारवाई करत काही वेळा गाड्यांवर दंड लावले असले तरी अजूनही या प्रकाराला आळा घातलेला नाही. नागरिकांनी मागणी केली आहे की शहरात 'नो हॉर्न' आणि 'मॉडिफाइड सायलेंसर'वर कठोर बंदी घालण्यात यावी, तसेच नियमित पेट्रोलिंगद्वारे या रायडर्सवर नियंत्रण ठेवावे.
दौंड शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments