हडपसरमध्ये ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात टीव्ही, मायक्रो ओव्हन न दिल्याने व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; इम्तियाज मेमनवर खंडणीचा गुन्हा...
पुणे (हडपसर): ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात बक्षिसासाठी टीव्ही किंवा मायक्रो ओव्हन देण्यास नकार दिल्याने एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी इम्तियाज इद्रीस मेमन (वय ४०, रा. जिजामाता वसाहत, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वसीम हनीफ शेख (वय ४७, रा. घोरपडी गाव) यांनी फिर्याद दिली असून, ते कन्स्ट्रक्शन व्यवसायासोबतच घोरपडीतील मस्जिदचे ट्रस्टी आहेत. फिर्यादी वसीम शेख यांची ओळख इम्तियाज मेमनमार्फत युवराज तोरडमल यांच्याशी झाली होती. २०२३ मध्ये कब्रस्तानच्या मोकळ्या जागेत होर्डिंग लावण्यासाठी युवराजने वसीम शेख यांना २० हजार रुपये दिले. मात्र, वक्फ बोर्डाशी संबंधित वादामुळे होर्डिंग लावता आले नाही. त्यानंतर युवराजकडून पैसे मागण्यात आले.
दरम्यान, इम्तियाज मेमन याने वसीम शेख यांना फोन करून होम मिनिस्टर कार्यक्रमात बक्षिसासाठी टीव्ही किंवा मायक्रो ओव्हन देण्याची मागणी केली. मात्र, वसीम यांनी सध्याची आर्थिक अडचण सांगून नकार दिला. त्यावर मेमनने ‘युवराजने तुला माझ्या सांगण्यावरून पैसे दिले होते. आता ते पैसे मला दे, नाहीतर उचलून नेईन,’ अशी धमकी दिली. शिवीगाळ करत धमकी दिल्यानंतर वसीम शेख यांनी थेट हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Post a Comment
0 Comments