Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

अवैध पत्रा बांधकाम अन् मनपा प्रशासनाची कुंभकर्णी झोप ; तक्रार देऊनही महापालिका प्रशासन ढिम्मच; अर्थपूर्ण साटंलोटं झाल्याच्या चर्चा?


अवैध पत्रा बांधकाम अन् मनपा प्रशासनाची कुंभकर्णी झोप
 ; तक्रार देऊनही महापालिका प्रशासन ढिम्मच; अर्थपूर्ण साटंलोटं झाल्याच्या चर्चा?

पुणे :- अवैध बांधकामासंदर्भात अनेकदा बोटचेपी भूमिका घेण्याचे काम पुणे महानगरपालिका प्रशासन गेल्या काही वर्षांमध्ये करीत आहे. अवैध बांधकाम कुठे सुरू असल्यास त्याची सु मोटो दखल घेणे हे मनपा बांधकाम विभागाचे काम आहे. परंतु मनपाचा बांधकाम विभाग सध्या ढिसाळपणाचा कळस गाठत असल्याचे दिसत आहे. कारण अवैध पत्रा बांधकामाची तक्रार देऊनसुद्धा अवैध बांधकाम काढत नसल्या कारणाने सध्या मनपा प्रशासन कुंभकर्णी झोपेत गेले की काय, अशी शंका यायला लागली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सर्वे नंबर ४६/६, नगर रोड, वडगाव शेरी येथे मे. बोरा-गलांडे असोसिएट्स कडून पत्र्याच्या शेडचे अवैध बांधकाम सुरू असल्यासंदर्भात सविस्तर तक्रार अॅड. भाऊसाहेब ढोकणे यांनी मनपाच्या बांधकाम विभागाकडे केली होती. या अवैध बांधकामासंदर्भात संबंधितांनी मनपाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याने मनपा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन हे बांधकाम तोडावे, अशी मागणी अॅड. ढोकणे यांनी आपल्या पत्रात केली होती.


हे बांधकाम एअर फोर्स स्टेशनच्या ९०० परिघात होत असल्या कारणाने यासंदर्भात परवानगी घेणे बंधनकारक आहे. खरेतर कुठेही अवैध बांधकाम होत असेल तर मनपा प्रशासनाने सु मोटो घेऊन कारवाई करणे  गरजेचे असते. मात्र, आता यासंदर्भात तक्रार देऊन अक्षरशः एक आठवडा उलटून गेला आहे, तरीही मनपा प्रशासन पूणपणे ढिम्म असून, हे पत्र्याचे अवैध बांधकाम तोडण्याची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 
सर्वसामान्य आणि गरिबांच्या अतिक्रमणांवर तात्काळ अत्यंत बेदरकारपणे हतोडा चालवणारे मनपा प्रशासन इथे मात्र फार ढिसाळपणा करीत असल्याने आता मनपा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आत्ता काही दिवसांपूर्वी कुदळवाडी येथे करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई ही संपूर्ण देशभर गाजत आहे. त्या ठिकाणी अत्यंत कठोर अशी कारवाई करीत अनेकांच्या बांधकामांवर मनपाने अक्षरशः नांगर आणि JCB फिरवला. या ठिकाणी अडीच हजारपेक्षा अधिक पत्र्याच्या शेडवर तोडक कारवाई करण्यात आली. मग कुदळवाडीमध्ये एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होते, तर पुण्यातील मनपा हद्दीतील ९ बीआरडी एअरफोर्स स्टेशनजवळ तयार करण्यात आलेले हे पत्र्याच्या शेडचे अवैध बांधकाम का तोडण्यात येत नाही, असा सवाल अनेक जण उपस्थित करीत आहेत.

अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण साटंलोटं तर नाही ना?
दरम्यान, तक्रार करूनदेखील या पत्र्याच्या अवैध बांधकामावर कारवाई होत नसल्या कारणाने जनतेत उलटसुलट चर्चा झडताना दिसून येत आहेत. या प्रकरणी मनपाच्या बांधकाम विभागातील झोन 2 च्या अधिकाऱ्यांचे अवैध बांधकाम करणाऱ्यांशी काही अर्थपूर्ण साटेलोटे तर नाही ना, अशी दबक्या आवाजात चर्चा होते आहे. मनपाचे काही अधिकारी अवैध बांधकाम करणाऱ्यांकडून माया गोळा करीत असल्याचा काही नागरिकांचा आरोप आहे.

भाग १ 

क्रमशः

पुढील भागात आणखीन माहितीचा उलघडा करणार!

Post a Comment

0 Comments